भाईंदर : मीरारोड पोलिस ठाण्यात मराठी एकीकरण समिती यांनी महाराष्ट्र पोलिस खात्याचा विशिष्ट प्रकारचा पंचकोनी तारे असलेला ज्यावर महाराष्ट्र पोलीस असे लिहलेला निळा ध्वज हे चिन्ह वापरून पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर पोलीस खात्याच्या बातम्या प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मीरारोड पोलिस ठाण्यात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिलेल्या जबाबात नमूद केले आहे की, मीरा भाईंदर परिसरात एका अनोळखी व्यक्तीने हिंदी भाषेत मिराभाईंदर पोलीस या नावाने फेसबुक खाते उघडुन त्यावर पोलिसांच्या बातम्या हिंदी भाषेत प्रसारीत केल्या जात आहेत. अशी माहिती मिळाल्यावरून देशमुख यांनी त्या फेसबुक पेजला जावुन पाहणी केली असता सदर पेज वर महाराष्ट्र पोलिस खात्याचा विशिष्ट प्रकारचा पंचकोनी तारे असलेला ज्यावर महाराष्ट्र पोलीस असे लिहलेला निळा ध्वज हे चिन्ह वापरून खाते असल्याचे आढळून आले. त्यामुळे फेसबुक पेज वापरणाऱ्या व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज २३ एप्रिल २०२१ रोजी इमेल वर पोलीस आयुक्त मिरा भाईदर वसई विरार आयुक्तालय यांच्याकडे केला होता. या तक्रारीवरून पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेल ने तपास केला असता सदर फेसबुक पेज वापरणारी व्यक्ती सुनील शर्मा असून तो मीरारोड येथील जहांगीर सर्कल जवळील ब्रॉड वे अवेन्यू संकुलातील आर्यन या सोसायटीच्या ए विंग मध्ये १९ व्या मजल्यावर राहतो असे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता फेसबुकवर खाते उघडून त्यावर हिंदी भाषेत पोलिसांच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या सुनील शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.
