नवी मुंबई – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थंडीच्या दिवसात जेष्ठ नागरिक व लहान मुलांना वायू प्रदूषणाचा त्रास होत असून अस्थमा, सी ओ पीडी ऍलर्जीचे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या तर्फे नोंदविलेल्या एका निरीक्षणात हि बाब समोर आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुप्फुसरोगतज्ञ डॉ अभय उप्पे म्हणाले, “नवी मुंबईत पहाटेच्या वेळी थंडीच्या लाटेत हवेची गुणवत्ता खाली गेल्याचे नोंद सफर संस्थेतर्फे केली गेली असून गेल्या आठ दिवसात जेष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये श्वसनविकारांचे प्रमाण जास्त अदधळून आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी २० ते ३० टक्के श्वसनविकारात वाढ झाली आहे.वाशी टोलनाका ते पनवेल यादरम्यान रोज हजारो वाहने ये जा करीत असतात यासोबतच अजून तीन महामार्ग नवी मुंबईला जोडले असल्यामुळे वाहनाच्या संख्येत वाढ होते. या वाहनातून निघणारा धूर तसेच औद्योगिक वसाहतींमधून निघणारा रासायनिक धूर व बांधकाम क्षेत्रामधून उडणारी धूळ याचा त्रिवेणी संगम नागरिकाचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. थंडीच्या दिवसात धुके असल्यामुळे हा धूर जामिनापासून २०० फुटाच्या वर जात नाही व याचा त्रास लहान मुले व जेष्ट नागरिकांना होतो. अस्थमा व इतर श्वसन विकार असलेल्या नागरिकांनी या दिवसात सकाळी ९ वाजल्यानंतरच बाहेर पडावे. गर्भवती महिलांच्या शरीरात या दूषित हवेमुळे विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते.”
वायू प्रदूषण व हृदयविकार याविषयी सांगताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, “आपल्याकडे घरात आणि घराबाहेरही वायू प्रदूषणाला विविध घटक जबाबदार आहेत. रस्त्यांवरील धुरळा, वाहनांचा धूर, धुलिकण, कारखाने, पिके आणि घरातील कचरा जाळल्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळते आहे. याचबरोबरच घर हे देखील वायू प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहेत. घरात रात्री दारे खिडक्या लावून साधारण सहा तासांसाठी जाळली जाणारी एक मच्छर अगरबत्ती अथवा उदबत्ती ही शंभर सिगारेटमधून निर्माण होणाऱ्या अतिसूक्ष्म धुलिकणांएवढी धोकादायक आहे. डिओड्रन्ट, परफ्यूम आणि फरशी स्वच्छ करणारी सुगंधी द्रव्ये या घटकांमुळे घरातील हवेच प्रदूषण धक्कादायकरीत्या वाढते आहे. यामुळे दमा विकार वाढीची शक्यता जास्त असते. याशिवाय, अशा व्यक्तींना विविध इन्फेक्शन होतात. हृदयविकार व फुप्फुसाचा कर्करोग तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने विविध व्याधी होऊ शकतात.”
