शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करून दोन गुन्हयात मोका कायद्याअंतर्गत तपास करुन गुन्हयात चोरीस गेलेली पुर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आला. पालघर जिल्हयातील बोईसर, पालघर, मनोर, विरार, वालीव, डहाणू, तारापूर, वाडा या पोलीस स्टेशनमध्ये संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदस्यांविरुध्द शस्त्रांचा धाक दाखवुन व मारहाण करून जबरी चोरी, वाहन चोरी, गंभीर दुखापती करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे मालमता व शरीराविरुध्दचे असे एकुण-२२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन.२०१८ मध्ये सदर गुन्हेगारी टोळीचा प्रमुख यास मा. न्यायालयाने एका गुन्हयात सात वर्षे शिक्षा व १५०० दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर संघटीत गुन्हेगारी टोळीतील प्रमुख व सदस्यांनी खालील नमुद दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. टोळीतील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी यांचे मुळ राहते घरी मलाठी, पो. टेहटा, पोलीस ठाणे, ता.मगदुमपुर, जि.जहानाबाद, राज्य-बिहार येथून अटक केली आहे.
१) दिनांक १६/१०/२०२० रोजी रात्री २०.१० वाजताचे सुमारास फिर्यादी वय-६५ वर्षे, हया पायी चालत जात होत्या. त्यादरम्यान काळया रंगाच्या मोटार सायकल आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीच्या गळयातील सोन्याची चेन जबरीने खेचून चोरुन पळून गेले. नमुद घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे.
२) फिर्यादी हया दिनांक-१९/१०/२०२० रोजी ७.३० वाजेच्या सुमारास ऍक्टिव्ह स्कुटी वर दळणाचा डबा घेवून घरी परत येत होत्या. त्यादरम्यान तीन अनोळखी इमसांनी येवून फिर्यादी यांचेशी झटापट करून त्यापैकी एका आरोपीने हातातील धारदार कोयता फिर्यादी यांच्या मानेवर ठेवला व फिर्यादीच्या कानाखाली मारून खाली ढकलुन दिले. त्यानंतर ते तिन्ही आरोपी हे फिर्यादी यांची गाडी घेवून लोकमान्य चौकाकडे पळून गेले. नमुद घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पालघर पोलीस ठाणे मध्ये ०२.३८ वाजता रजिस्टरी गुन्हा दाखल करण्यात आला.
श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर व श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्हयांचा तपास श्री विश्वास दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग हे करीत आहे.
