उत्तन: दिनांक १४/०७/२०२१ रोजी प्रभाग १ मधील उत्तन परिसरात सरकारी जागेवर बांधण्यात आलेल्या अनाधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्यात येऊन रिसॉर्टचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
मिरा भाईंदर कार्यक्षेत्रात अवैध बांधकामांवर आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार , उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्याच आठवडयात उपायुक्त अजित मुठे यांच्या दालनात सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात उपायुक्त मुठे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अवैध बांधकामांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. प्रभागात कोणत्याही प्रकारचे अवैध बांधकाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या . प्रभागात अवैध बांधकामे झाल्यास त्यासाठी संबधितांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश उपायुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रभागात मोठया प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, अवैध फेरीवाले, होल्डींग्स, पदपथावरील अतिक्रमणे यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उत्तन परिसरातील शासकीय जमिनीवर नितीश मिश्रा व राजेश पाटील यांनी निधी नॅचरल या रिसॉर्टचे अनाधिकृत बांधकाम सरकारी जागेवर करण्यात आले होते. या रिसॉर्टवर दिनांक १४/०७/२०२१ रोजी तोडक कारवाई करण्यात येऊन रिसॉर्टचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाई प्रसंगी उपायुक्त अजित मुठे , अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम , कनिष्ठ अभियंता योगेश भोईर , त्याचप्रमाणे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व त्यांचा कर्मचारी वर्ग, महसूल खात्याचे कर्मचारी , अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हे उपस्थित होते . यापुढे मिरा भाईंदर कार्यक्षेत्रात अवैध बांधकामांवर मोठया प्रमाणात कारवाई सुरुच राहणार आहे असे सांगण्यात आले.
