नंदुरबार : दिनांक : ३१/५/२०२२ रोजी म्हसावद ता. शहादा येथील एक ४३ वर्ष नोकरदार इसम हा घाबरलेल्या अवस्थेत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांना भेटण्यासाठी आला होता प्रथम तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी त्यांची विचारपूस केली त्यावेळी त्याने सांगितले कि दिनांक ९/४/२०२२ सकाळच्या दरम्यान त्याला एका अनोळखी महिलेने फोन केला व स्वत:ची ओळख न देता बोलू लागली. त्यानंतर ती महिला तक्रारदार यास वारंवार फोन करु लागली. काही दिवसांनी त्या अनोळखी महिलेने तक्रारदार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तक्रारदाराने त्या महिलेस भेटण्यास नकार दिला. त्यामुळे त्या महिलेने तक्रारदार यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करू लागली व त्याचा व्हिडीओ तयार करुन घेतला व तक्रारदार यास सुरुवातीस सदर घटनेचे कोणतेही गांभीर्य वाटले नाही परंतु सदर महिलेने दुसऱ्या दिवसापासून तिचे खरे स्वरुप दाखविण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी तक्रारदार यास त्याचे ओळखीचा पोलीस छोटु शिरसाठ याने फोन करुन बदनामी करण्याची भिती दाखवून मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार यास प्रचंड मानसिक त्रास देवून तसेच त्याची बदनामी करण्याची भिती दाखवून १४ लाख रुपयांची मागणी केली परंतु तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसतांना देखील सामाजीक प्रतिष्ठा व बदनामीच्या भितीने तसेच व्हिडीओ कॉलची असलेली क्लीप नष्ट करण्याच्या अटीवर छोटु शिरसाठ पोलीस याचे मार्फतीने तक्रारदार याने सदर महिलेस ९ लाख रुपये दिले.परंतु काही दिवसांनी एक तथाकथीत पत्रकार देखील तक्रारदार यास पुन्हा ९ लाख रुपयांची मागणी करू लागला त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचारी छोटु शिरसाठ यांस विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याकारणास्तव तक्रारदार याच्या एका मित्राने त्यास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना भेटण्यास सांगून ते न्याय देतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार हा मा.पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे आला होता.
सदरची घटना अतिशय गंभीर होती. तसेच तक्रारदार हा आत्माहत्या करण्याच्या परिस्थितीत पोहोचल्याचे त्याच्या मनस्थितीवरुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांना दिसून आले तसेच ह्या घटनेचा समाजावर विपरीत परीणाम होत असल्यामुळे मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील यांनी याबाबत मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय पवार यांचेशी चर्चा करुन तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना ताबडतोब कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यावरुन शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर घटनेबाबत शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपीत १) अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला २) तथाकथीत पत्रकार नामे अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) वय-५० रा. दत्त कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार व ३) पोलीस नामे छोटु तुमडु शिरसाठ वय-४६ रा. सदाशिव नगर, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून तात्काळ अटक करण्यात असून मा. न्यायालयाने तीनही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी वरील घटना पाहता नागरिकांना आवाहन केले आहे कि नंदुरबार तसेच इतर राज्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी. तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री.पी.आर.पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. विजय पवार, मा. उप विभागीय पोलीस अधीकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक बुधवंत, सहा.पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्रीमती माया राजपुत तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अमंलदारांच्या पथकाने केली आहे.
