मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिस-या लाटेचा धोका संपलेला नाही. दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय विभाग, सर्व डॉक्टरांची आपत्कालीन बैठक घेतली.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या कोव्हीड चाचण्या व त्यांना त्वरित विलगिकरण करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले होते. काल दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमार्फत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९ प्रवाशांची यादी मिरा भाईंदर महानगरपालिकेस प्राप्त झाली. प्रवाशांची यादी प्राप्त होताच एका तासाच्या आत मिरा भाईंदर महानगरपालिका संबंधित आरोग्य केंद्रामार्फत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९ प्रवाशांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. संबंधित ९ प्रवाशी व त्यांच्या नातेवाईकांचा कोव्हिड अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. अहवाल हा निगेटिव्ह आला असला तरीसुद्धा संबंधित ९ प्रवाशांना शासनाच्या निर्देशानुसार विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता मिरा भाईंदर शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन सूचित करण्यात आले आहे की त्यांच्या परिसरात/सोसायटीमध्ये मागील १५ दिवसांत किंवा येणाऱ्या काळात एखादा व्यक्ती हा परदेशातून आला असेल तर महानगरपालिका वॉर रूम 022-28141516 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्या व्यक्तीची माहिती देण्यात यावी. जेणेकरून मिरा भाईंदर शहरात दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा प्रसार जास्त प्रमाणात थांबण्यासाठी महानगरपालिकेस शक्य होईल.
