दिनांक २९/०७/२०२१ रोजी सायंकाळी ०८ च्या सुमारास आयसीआयसीआय बँक विरार पूर्व याठिकाणी डेप्युटी मॅनेजर श्रीमती योगिता चौधरी व कॅशियर श्रीमती श्रद्धा देवरूखकर काम करीत असताना, सदर बँकेत पूर्व मॅनेजर राहिलेला अनिल कुमार राजदेव दुबे हा जबरदस्ती चोरी करण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार घेऊन बँकेत आला. त्यावेळी स्टाफ रूम मध्ये काम करीत असलेल्या डेप्युटी मॅनेजर श्रीमती योगिता चौधरी यांनी आरोपी अनिल कुमार दुबे यांना रूम मध्ये बोलाविले व श्रीमती योगिता चौधरी या मेस रूम मध्ये आल्यानंतर आरोपी अनिल दुबे यांनी श्रीमती चौधरी यांच्या गळ्यावर व इतर ठिकाणी त्याच्याकडील धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करून ठार केले. सदर वेळी कॅश रूम मध्ये असलेल्या कॅशियर श्रीमती श्रद्धा देवरुखकर यांना श्रीमती योगिता चौधरी यांचे ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी लागलीच बँकेतील सायरन वाजविला व मेस रूमकडे धावत गेल्या असता अनिल दुबे याने दरवाजामध्ये श्रीमती श्रद्धा देवरुखकर यांच्या गळ्यावर व शरीरावर वार करून त्यांना देखील गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सदर प्रकरणी बँकेचे मॅनेजर श्री नितीन बबन आंब्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल कुमार राजदेव दुबे यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.
