देवपूर (जामनेर) : भोंदू बाबाला अटक करून त्याच्या कडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत . अधिक माहितीनुसार सौ किरण जडे व तिचे पती आणि मुलगा हे हे घरात असताना दिनांक २९/६/२०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास आरोपी अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे गेला व त्यांनी भविष्य बघण्यासाठी त्या भोंदू बाबाला घरात बोलवले व पाणी दिले. तेव्हा आरोपीने किरण जडे व तिचे पती यांना सांगितले की तुमचे सगळे चांगले करतो असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली नंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली व तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र मारून तुमची परीक्षा घ्यायला आलो आहे, असे सांगून तुमच्या अंगावरील सोने द्या, ते मी सोबत नेणार नाही व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो व तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून किरण जडे यांनी भोंदू बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टाप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले व नंतर फरार झाला. संध्याकाळी किरण जडे जेवणासाठी वाट बघितली परंतु तो आलाच नाही. त्याचे नाव,गाव, पत्ता माहीत नव्हते. अशा प्रकारे फिर्यादीची फसवणूक करून विश्वासघात करून भोंदू बाबा आरोपी फिर्यादीचा वर नमूद मुद्देमाल घेऊन गेला व तेव्हापासून तो फरार होता. सदरबाबत देवपूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर बाबत पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून त्याच्या कडून वर नमूद प्रमाणे सोन्याचे दागिने व त्याचे ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला आहे. आरोपी भोंदू बाबा नारायण किसन चव्हाण, वय ३५, धंदा भिक्षा मागणे व भविष्य सांगणे, राहणार ओझर खुर्द, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, यास अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती घेतली असता त्याच्या विरुद्ध जामनेर जिल्हा जळगाव येथे अजून या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याची पोलीस अधिक माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब, मा .अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री एस ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री सतीश घोटेकर व त्यांचे डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार पंकज चव्हाण, पोना. विश्वनाथ शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल किरण सावळे, सागर थाटसिंगारे, सौरभ कुठे, यांचे पथकाने केली आहे.
देवपूर पोलिसांच्या वतीने सर्व नागरिकांना व महिलांना असे आवाहन करण्यात येत आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या भोंदू बाबांच्या फुलथापांना बळी पडू नये व अशा अनोळखी इसमांना घरामध्ये प्रवेश देऊ नये व त्यांच्याकडे आपले मूल्यवान वस्तू दागिने सोपू नये, असे कोणी संशयित आपल्या परिसरात फिरताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, आजूबाजूचे परिसरातील लोकांना सावध करावे. ही नम्र विनंती केली आहे.
