पेल्हार : पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने फायरींग करुन लुटमार करणा-या आरोपींना १२ तासात अटक करुन गावठी कट्टा व ३ जिवंत काडतूस हस्तगत केली आहे . अधिक माहितीनुसार दिनांक- २१/०६/२०२२ रोजी सकाळ च्यासुमारास प्रजापती हे त्यांचेकडील असलेल्या बॅगमध्ये ५०,०००/- रुपये घेवुन शानबार नाका येथे रिक्षातुन उतरत असतांना ०९.३० वा.चे सुमारास दोन अनोळखी इसमांनी मोटर सायकल वरुन येवुन त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने प्रजापती यांच्या बॅगेमधील ५० हजार रूपये खेचुन नेण्याचा प्रयत्न करित असतांना प्रजापती यांनी आरोपीस विरोध केला असता त्यांना जिवेठार मारण्याच्या उद्देश्याने आरोपी यांनी त्याच्याकडील गावठी कट्टयाने प्रजापती यांच्यावर गोळीबार करून दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या घटनेबाबत श्री प्रजापती रा. नालासोपारा (पु.), ता. वसई, जि. पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पेल्हार पोलीस ठाणे दिनांक २१/०६/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ यांचे आदेशान्वये व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच चार वेगवेगळी पोलीस पथके तयार करुन आरोपी यांचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. गुन्हयाच्या घटनास्थळावर पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवुन तांत्रिक पुरावे हस्तगत करुन आरोपी यांची माहिती प्राप्त केली मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हे धानिव गावचे पाठीमागील सर्वे नं. ५ व ६ चे लगत असलेल्या वनविभागाचे डोंगरात वेगवेगळया दिशेने पळाले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी १) मो. उवैश ऊर्फ जावेद समीम खान, २) रविंद्र अंकुश निगुडकर, ३) सद्दाम करमहुसेन खान, रा. नवजीवन, वसई पुर्व, मुळ रा. उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यातील एक आरोपी हा जंगलात लपुन बसलेला असतांना त्यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडुन मिळुन आलेल्या माहितीचे आधारे इतर दोन आरोपी यांना दिनांक २१/६/२०२२ रोजी अटक करण्यात आली असुन अटक आरोपी यांच्या कडुन गुन्हा करण्याकरीता वापरलेला ०१ गावठी कट्टा, ०३ जिवंत काडतुस, ०२ मोटर सायकल असा एकुण-७५,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पा.उप.नि./सनिल पाटील, पोहवा/योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, पो.ना./ प्रताप पाचुंदे, पो.अं/ संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, रोशन पुरकर, किरण आव्हाड, बालाजी गायकवाड, पोहवा/नामदेव ढोणे नेम.सपोआ कार्यालय, विरार यांनी केली आहे.
