भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक २ कार्यक्षेत्रातील शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने फेरीवाल्याविरोधात दिनांक २८/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २८/११/ २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून प्रभाग समिती क्रमांक २ बॉम्बे मार्केट येथील ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना चप्पल विक्रेता अब्दुल रेहमान निजामुद्दीन हाशमी या फेरीवाल्याने महानगरपालिकामार्फत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईचा विरोध करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केली. त्यामुळे सदर फेरीवाल्यावर धमकी देणे, शारीरिक बळाचा उपयोग करून मारहाण करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने भारतीय दंड संहितेनुसार भाईंदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई उपायुक्त(अतिक्रमण) मारुती गायकवाड, अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले, कनिष्ठ अभियंता वैभव कुलथे यांच्या मार्गदर्शनानुसार फेरीवाला पथक प्रमुख राकेश त्रिभुवन, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ठेका मजुर यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
