आग्री पाडा पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई, दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात दुकान फोडून २३ मोबाइल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच चौघांना अटक केली. हे सर्व परप्रांतीय श्रमिक असून, लाॅकडाउनमुळे स्वत:च्या राज्यात घरी परतले होते. मात्र, तेथेही रोजगार नसल्याने मुंबईत परतले आणि पैशांसाठी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अडकले.
आग्रीपाडा येथील एक मोबाइलचे दुकान चोरट्यांनी जुलैच्या अखेरीस फोडले. दुसऱ्या दिवशी मालकाने दुकान उघडले त्यावेळी चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याबाबत तक्रार केल्यानंतर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत टेकवडे यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. या फुटेजमध्ये दिसणारे अस्पष्ट चेहरे खबरे, तसेच इतर माहितगारांना दाखविण्यात आले. चौघांपैकी एकावर पूर्वी चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याने त्याची ओळख पटली. त्याआधारे पोलिसांनी मुकीम शेख, सरवारअली, वासिम खान, अमजद सईद यांना अटक केली.
हे चारही आरोपी परप्रांतीय असून, कॅटरिंग तसेच विविध ठिकाणी मजुरी करतात. मार्चमध्ये लाॅकडाउन लावण्यात आल्याने सर्व जण आपल्या मूळ गावी परतले. गावाला उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने उपासमार होऊ लागली. त्यामुळे ते पुन्हा मुंबईत परतले. मात्र, मुंबईतही अद्याप लाॅकडाउन आणि उद्योगधंदे सुरू नसल्याने त्यांचे राहणे मुश्कील झाले. त्यातच घरी कुटुंबाला पैसे पाठविण्याची चिंता सतावत होती. या चौघांची प्रवासादरम्यान ओळख झाली होती आणि त्यातच एकावर जुना गुन्हा असल्याने त्याने इतरांना चोरीसाठी प्रवृत्त केले. पैसे नसल्याने सर्व चोरीसाठी तयार झाले आणि चौघांनी दुकान फोडल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
