वेंगुर्ला :सामाजिक कार्य करणाऱ्या समस्त महिलांच्या अस्मितेला व आत्मसन्मानाला असे घाणेरडे कृत्य करून अटक आरोपींनी ठेच पोहोचविल्याचा संस्थेचा आरोप.श्री क्षेत्र रेडी श्री गजानन देवस्थान येथे संप्रोक्षण कलशारोहण हा कार्यक्रम रविवार दिनांक २६ मार्च २०२३ ते २८ मार्च २०२३ रोजी पर्यंत रेडीच्या स्वयंभू द्विभुज श्री गणपती मंदिरात करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व इतर राज्यातील येणाऱ्या श्री.गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अखिल भारतीय भंडारी महासंघ, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व LBN न्यूज या संस्थेच्या व समाजाच्या माध्यमातून रेडी म्हारतळे येथे रस्त्याच्या कडेला बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवर स्वयंभू गणपती व ग्रामदेवता स्वयंभू श्री देवी माऊली यांच्या फोटोसह संस्थेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांचे नावासह फोटो लावण्यात आले होते.
दिनांक २९ मार्च २०२३ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी संगनमताने त्या बॅनरची लाकडी फ्रेम तोडून बॅनर फाडून त्यावरील महिलांच्या फोटोंवर स्त्रियांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बॅनरवर अश्लील शब्दात शिवीगाळी लिहून, स्त्री पुरुषांच्या लिंगाचे पेनाने चित्र काढून, पदाधिकाऱ्यांचे चेहरे विद्रुप करून शिरोडा मिठागर येथे रात्री अज्ञातांनी नेवून लावला होता. या गंभीर व किळसवाण्या प्रकरणाची तक्रार संस्थेचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांनी सह्याचे तक्रार निवेदन पोलीस निरीक्षक वेंगुर्ला यांना दिनांक ४ एप्रिल रोजी दिले होते.
सदर तक्रारीवरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याचा पुढील तपास हा वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर यांना वर्ग करण्यात आला. सदर गुन्हा हा गावात रात्रीचा घडला असल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गुन्ह्याचा अधिक तपास करीत असतांना अज्ञात इसम हे गावातील असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे फुटेज मधील दुचाकीवरून बॅनर घेऊन जाणाऱ्या आरोपींच्या स्पेल्डर गाडीची ओळख पटवून आतापर्यंत गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी स्वप्नील विजय राणे, रा.रेडी हुडावाडी, चंद्रकांत यशवंत राणे, रा. रेडी हुडावाडी, तुकाराम प्रल्हाद सावंत, रा. रेडी गावतळे, राहूल लक्ष्मीकांत राणे, रा.रेडी हुडावाडी, देवेश दशरथ राणे, रा. रेडी हुडावाडी यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व स्प्लेनडर मो.सायकल या दोन गाड्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दाभोळकर यांनी दिली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर करीत असून गुन्ह्यातील संस्थेचे पदाधिकारी व साक्षीदार असलेले राजन रेडकर, भूषण मांजरेकर, आशिष सुभेदार, अरुण कांबळी, रविंद्र राणे, आबा चिपकार, दयानंद कृष्णाजी, राजेश सातोसकर, सौरभ नागोळकर, दिलीप साळगावकर, मुरलीधर राऊळ व इतर पदाधिकारी सदस्य व महिला यांनी सदर गुन्ह्यातील अटक आरोपींना हा कट रचून हे कृत्य करण्यास भाग पाडले त्यामागील प्रमुख सूत्रधार असणाऱ्या पाहिजे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.
गुन्ह्यातील अटक आरोपींनी असे जाणीवपूर्वक घाणेरडे कृत्य करून स्त्रीयांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बॅनर वरील फोटोंवर अश्लील शब्दात शिवीगाळ लिहून, पदाधिकाऱ्यांच्या चेहेऱ्याचे पेनाने विद्रुपीकरण करून, फोटोंवर स्त्री पुरुषांच्या लिंगाचे पेनाने चित्र काढून, संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या समस्त महिलांच्या अस्मितेला व आत्मसन्मानाला असे कृत्य करून ठेच पोहोचवून, स्त्रियांना घृणास्पद वागणुक देऊन अपमानित केलेले आहे. याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगाच्या मा.अध्यक्षांना व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना केलेली असून, शासनाने महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना सन्मानाने वागणूक देवून, सामाजिक कार्यातील मुख्य प्रवाहात आणण्याचे शासन प्रयत्न करीत असताना, असा महिलांबाबत अनादर करण्याचा हा गैरप्रकार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील अटक आरोपींनी केल्याने, रेडी गावास बदनाम करून, महिलांबाबत अश्लील लिखाण करून असा किळसवाणा प्रकार केल्याने खळबळ माजली आहे.
