नालासोपारा : मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत नालासोपारा पोलीस ठाणे हददीत गास गांव, नालासोपारा (प.) येथे राहणारे केझिटल जॉन अल्फान्सो यांना दिनांक २८/०७/२०२२ रोजी त्यांचे मोबाईलवर अज्ञात इसमाने अदानी इलेक्ट्रीक सिटीमधून बोलत असल्याचे भासवून तुमचे गोरेगाव येथील फ्लॅटचे विजेचे बिल भरणे बाकी आहे ते न भरल्यास विज पुरवठा खंडीत होईल, सदर विजपुरवठा अखंडीत चालू ठेवण्याकरीता तात्काळ ऑनलाईन बिल भरा असे सांगुन त्यांनी अल्फान्सो यांना एक लिंक पाठविली. सदरची लिंक अल्फान्सो यांनी ओपन केली असता त्यावर क्विक सपोर्ट हया अँप्लिकेशनद्वारे अज्ञात इसमाने अल्फान्सो यांच्या बँक खात्या मधुन ४,५०,०००/- रुपये डेबिट केली व त्यांची फसवणूक केल्याने केझिटल अल्फान्सो यांनी लागलीच नालासोपारा पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज सादर केला.
नमूद तक्रार अर्जाची पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त केली. त्यावरुन तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम हि प्रथम पेटीएम या ऑनलाईन पेमेंट गेटवेवर गेल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने पेटीएम ऑनलाईन पेमेंट गेटवे वर तात्काळ मेल करुन त्यांना व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. त्यानंतर पेटीएम ऑनलाईन पेमेंट गेटवे यांनी तक्रारदार यांच्या फसवणुक झालेल्या रक्कमेचा तनिष्क गोल्ड गिफ्ट कार्ड या ऑनलाईन साईटवर गिफ्ट व्हाऊचर्स विकत घेण्यासाठी वापर झाल्याचे कळविले. त्याबाबत नालासोपारा पोलीस ठाणे यांनी लागलीच तनिष्क गोल्ड गिफ्ट कार्ड यांचे नोडल अधिका-यांशी पेटीएम ऑनलाईन पेमेंट गेटवे मार्फत पत्रव्यवहार (ई मेल) केला असता तनिष्क गोल्ड व्हाऊचर्स यांनी सदरचे व्हाऊचर्स रद्द करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली रक्कम ४,५०,०००/- रुपये ही पेटीएम ऑनलाईन पेमेंट गेटवे मदतीने तक्रारदार यांच्या मुळ खात्यावर परत केली. अशाप्रकारे नालासोपारा पोलीस ठाणे यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे तक्रारदार यांची फसवणुक झालेली रक्कम रु.४,५०,०००/- ही परत मिळविण्यास यश प्राप्त केले आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ विरार, श्री. चंद्रकांत जाधव, सहा.पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास सुपे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे यांनी पार पाडली आहे.
