विरार : दिनांक १८/०६/२०२१ रोजी ते दिनांक. २०/०६/२०२१ दरम्यान अज्ञात चोरट्यांने ब्रम्हा अपार्टमेंट १०२, मध्ये राहणारे रहिवाशी यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून बेडरुमच्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरी करुन नेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हयाचे घटनास्थळावरील प्राप्त तांत्रिक पुरावे, आरोपीची गुन्हा करण्याची कार्यपध्दती आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन विरार पोलीस ठाणे च्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीला कारगील नगरमधून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याचे कबुल केले. यातील आरोपी हा स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने बंद घर/फ्लॅट, शटरचे कडी कोयंडा ऊचकटून त्यामध्ये असलेली रोख रक्कम, सोने चांदीचे दागीणे आणि वस्तुंची चोरी करित असतो. त्याकरीता दिवसाच्या वेळी परीसरामध्ये फिरुन रेकी करणे आणि रात्रीच्या वेळी चोरी करणे अशी त्याची गुन्हा करण्याची पध्दत आहे. आरोपी श्रीपत नारायण शिगवण, वय ३८ वर्षे, रा. ११० (भाडेतत्वावर), बिल्डींग क्र. ०२, साईबाबा संकुल, विरार (पू.), यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून तपासामध्ये त्याच्या कडून १२२.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, ३० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागीने व इतर असा एकुण ४,३४,९००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याने एकुण १३ गुन्हे केल्याची तपासामध्ये माहिती दिली आहे.
सदरची कामगीरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ व श्रीमती रेणुका बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रफुल्ल वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, संदेश राणे, पो.हवा. सचिन लोखंडे, पो.ना. विजय दुबळा, दिलीप बरफ, हर्षद चव्हाण, भुषण वाघमारे, संदिप शेरमाळे, पो.शि. इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटील, पवन पवार आणि राहुल घोलप यांनी केली आहे.
