वालीव पोलीस ठाण्यांकडुन ऑनलाईन फ्रॉड करणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करुन १० लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात यश

Crime News

लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरीकांना वेगवेगळया गुंतवणुकीच्या सुरस योजना सुचवुन/भुलथापा देऊन त्यांना ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांत आश्चर्यकारक वाढ झालेली होती. सबब, अश्या घटनांना आळा घालणे, नागरींकांना सतर्कतेच्या सुचना देऊन अश्या भुलथापांना बळी पडण्यापासुन त्यांना परावृत्त करणेकरीता तसेच सदर ऑनलाईन फ्रॉड करणा-या इसमांचा शोध घेऊन अपराधांची उकल करणेबाबत सुचना मा.श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक सो, पालघर यानी दिलेल्या होत्या.
त्यायोगे, शुक्रवार, ०४ सप्टेंबर, २०२० रोजी वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी/पोलीस कांचा यांना त्यांच्या विश्वासु बातमीदाराकडुन ‘‘गरजु व गरीब नागरीकांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांना २०/२५ हजाराचे आमिष दाखवुन मोबदल्यात त्यांचे बॅकेत खाते उघडण्याकरीता आवश्यक मुळ कागदपत्र प्राप्त करुन त्यांचे नावे विविध बँक शाखांमध्ये बचत/चालु खाते उघडुन तसेच नमुद नागरीकांच्या वैध कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल सिमकार्ड मिळवुन प्राप्त मोबाईल क्रमांक बॅकेच्या नेट बँकिंग सुविधेकरीता तसेच बँकेच्या विविध बँक व्यवहारांकरीता वापरात आणणारा व कागदपत्र तसेच सिमकार्ड अवैधरित्या स्वत:चेच ताब्यात ठेवुन अवैध मार्गानी मोठया आकडयांच्या रकमा बोगस नागरीकांच्या खात्यांत वळवुन तथा सदरहु खाते बेकायदा स्वत:च हाताळून आर्थिक स्वरुपाचे गुन्हे करणारा गुन्हेगार इसम अजय आणि त्याचा साथीदार रफिक वसई पुर्वेकडील रेंड ऑफिस येथील केटली नामक चहाच्या दुकानात येणार आहे’’ अशी माहिती मिळाली. नमुद मिळालेल्या बातमीच्या आधारे प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस ठाणे तसेच
गुन्हेप्रकटिकरण शाखेच्या अधिकारी/कर्मचारी यानी मानवी सापळा रचुन उत्तर प्रदेश येथील रहिवासी इसम नामे १) अजय महेशनाथ पंडीत आणि कर्नाटकातील रहिवासी २) रफिक नन्नुशहापाशा शेख यांना त्याचेकडील काळया महिंद्रा एक्सयुव्हि कार नंबर एम. एच. ४८ – ई – १२१२ हिचेसमवेत ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर इसमांच्या ताब्यात एकुण १० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने २ लॅपटॉप्स, ८ स्मार्टफोन्स, मेमरी कार्ड, ३ सिमकार्ड, महिंद्र एक्सयुव्हि कार, विविध बँकाचे व वेगवेगळया ईसमांच्या नावाचे २५ अ‍े.टी.एम. कार्डस, आरोपींनी स्थापीलेल्या बोगस रुद्रा सोल्युशन कंपनीचे पॅनकार्ड, तसेच विविध बँकाकडील निरनिराळया खाते क्रमांकचे आणि धारकांचे एकुण ३३ धनादेश पुस्तिका मिळून आलेल्या आहेत.
सदर आरोपीकडे केलेल्या अधिक सखोल चौकशीत अजय महेशनाथ पंडीत याने तो त्याचा कोलकाता, राज्य-पश्चिम बंगाल येथे राहणारा धाकटा भाऊ नामे अभय पंडीत आणि त्याच्या मित्र अविनाश आनंद दास याच्या सांगण्यावरुन गरजु व गरीब नागरीकांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांना ठरावीक रकमांचे आमिष दाखवुन त्यापोटी त्यांचे मुळ कागदपत्र प्राप्त करुन त्यांचे नावे विविध बँक शाखांमध्ये बचत/चालु खाते उघडुन तसेच नमुद नागरीकांच्या वैध कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड मिळवुन नमुद मोबाईल क्रमांक बॅकेच्या नेट बँकिंग सुविधेकरीता, ओटीपी मिळवण्याकरीता वापरात आणतो. अभय आणि अविनाश दास हे दोघे कोलकाता येथील सॉल्टलेक येथे बेकायदा कॉलसेंटर चालवुन सदर कॉल सेंटरच्या माध्यमातुन लोकांना संपर्क साधुन त्यांना भाडे तत्वावर मोबाईल टॉवर उभारणीकरीता नागरीकांकडे जमीनीची मागणी करुन त्यापोटी मोठया रक्कमेचे मासीक भाडे देण्याचे खोटे आश्वासीत करुन नमुद मोबाईल टॉवर उभारणीच्या व्यवहाराकरीता अग्रीमेंट करणेकरीता आगाऊ ठरावीक रक्कम भरण्याकरीता नागरीकांना उद्युक्त करुन अग्रमेंटचा रकमा बेकायदा सक्रिय केलेल्या विविध बँक खात्यात भरावयास लावुन नागरीकांची आर्थिक फसवणुक करुन पैसे लाटत असल्याचे व सदर कामाकरीता वरील नमुद ईलेक्ट्रानिक जप्त सर्व सामग्री तो वापरात असल्याचे उजेडात आले आहे.
आरोपीकडे केलेल्या चौकशीत खालील ऑनलाईन प्रकाडची विविध राज्यातील गुन्हयाची उकल झालेली आहे.
१) कारधा पोलीस ठाणे जि. भंडारा जिल्हा गु.र.नं. १२६/२०२० भा.दं.वि.संहिता िकलम ४२०, ५०७, सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ अन्वये
२) सायबर सेल पोलीस नियंत्रण कक्ष, छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश येथे तक्रार क्रमांक ६७/२०२० अन्वये
३) हसन सायबर पोलीस ठाणे जि. हसन राज्य : कर्नाटक येथे गुरनं २३/२०२० भादविंसक ४१९, ४२० सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी)
४) ओरीसा क्राईम ब्रांच बक्सी बाजार कंप्लेंट नंबर ३१२/२०२० अन्वये तक्रारी नोेंद असल्याचे तथ्य निष्पादीत झालेले आहे.
वरील कारवाई मा. श्रीमान दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस अधीक्षक सो, जि. पालघर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री. विजयकांत सागर, मा. अपर पोलीस अधीक्षक, वसई यांचे सुचनाप्रमाणे आणि श्री. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वसई उपविभाग यांच्या निगराणीखाली प्रभारी अधिकारी श्री. विलास चौगुले त्याचप्रमाणे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश फडतरे, पो.हवा/रविंद्र पवार, मुकेश पवार, मनोज मोरे, पो.ना./राजेंद्र फड, अनिल सोनावणे, सतिष गांगुर्डे, पो.शि./बालाजी गायकवाड, स्वप्नील तोत्रे, सचिन बळीद अश्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
पालघर पोलीस दलाकडुन नागरीकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, त्यानी आपल्या बॅकेसंबंधी कुठलीही माहिती अनोळखी इसमांना प्रत्यक्ष अगर समाजमाध्यमावरुन, मोबाईलवरुन अप्रत्यक्षपणे शेअर करु नये. कुठल्याही वाढीव परतावा देणा-या कपोलकल्पीत जीओ टॉवर गुंतवणुकीसारख्या योजनांना बळी पडु नये.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply