मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात काल पासून प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली असून काल केलेल्या कारवाईत प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करुन रुपये.४०,०००/-दंड वसूल करण्यात आला.
त्याच अनुषंगाने आज मंगलनगर,हटकेश या परिसरात मा. आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे सहायक आयुक्त सचिन बच्छाव, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड, प्रभाग ४ चे फेरीवाला पथक प्रमुख रणजित भामरे यांनी कारवाई करुन १८० किलो प्लास्टिक जप्त केले.
याबाबत सविस्तर वृत असे कि,आज हटकेश परिसरात नियमित साफसफाईचे काम सुरू असतांना एका दुचाकी वाहनावर प्लास्टिकच्या पिशव्या घेवून जाणारी महिला आढळली.त्याबाबत विचारणा केली असता सदर हॅन्डल बॅग या विविध फेरीवाले,भाजी विक्रेते यांना पुरवठा करीत असल्याचे सांगितले.सदर महिलेच्या वाहनावर प्रेस असे स्टीकर चिकटवलेले आढळले असून ही महिला पेणकर पाडा येथिल रहिवासी आहे.सदर महिलेला दंड भरावयास सांगितले असता तिने दंड भरण्यास नकार दिला.त्यामुळे सदर वाहन महापालिकेकडून जप्त करण्यात आले.त्याच प्रमाणे प्लास्टिक ही जप्त करण्यात आले.
सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्त अजित मुठे यांनी स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांना दिले आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात अवैध प्लास्टिक निर्मात्यांवर व विक्रेत्यांवर अशीच कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.
