केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. त्यानुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक श्री समीर अहीरराव यांना यावर्षीचे ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर करण्यात आले आहे.
दिनांक २१/८/२०२१ रोजी नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील चंद्रेश पॅलेस, शॉप नं. ७, एस टी डेपो रोड, नालासोपारा पश्चिम येथील साक्षी ज्वैलर्स या दुकानामध्ये सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी प्रवेश करुन दुकानमालक श्री किशोर जैन यांचे दोन्ही हात सेलोटेपने बांधून त्यांच्या डोक्यावर व शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार मारुन दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी करुन पळून गेले होते. गुन्हयातील अज्ञात आरोपींनी स्वत:ची ओळख लपविण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेवून सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला होता. सदरचा क्लीष्ट व संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे व गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी/ अंमलदार यांनी अहोरात्र मेहनत घेवून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केले होते. सदरवेळी नालासोपारा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले श्री समीर अहीरराव यांनीदेखील अज्ञात आरोपींची ओळख निष्पन्न करुन गुन्हे शाखेतील अधिकारी/अंमलदार यांच्या मदतीने दोन्ही आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली होती व सदर गुन्हयाचा योग्यरित्या तपास करुन मा. न्यायालयामध्ये मदतीत दोषारोपपत्र सादर केले होते. सदर कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक श्री समीर अहीरराव, सध्या. नेम- मनुष्यवध तपास पथक, गुन्हे शाखा यांना केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दिनांक ७/१/२०२१ रोजी नयानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एस कुमार, गोल्ड अॅन्ड डायमंड, सेक्टर-४, शांतीनगर मिरारोड पुर्व जि. ठाणे येथे दुपारी १४:०० वाजताचे सुमारास फिर्यादी श्री निगेश मोहन हे सोन्याच्या दुकानामध्ये काम करित असतांना ४ अनोळखी आरोपींनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने येवून श्री निगेश मोहन यांना पिस्टलचा धाक दाखवून सदर सोन्याच्या दुकानातून ९५,५०,०००/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जबरीने चोरुन नेले होते. सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांना निष्पन्न करुन अटक केली. तसेच सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर मकोका कायद्यान्वये कारवई करुन त्यांचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सदर गुन्हयामध्ये प्राथमिक तपास करणारे श्री जितेंद्र वनकोटी, सध्या नेम- नयानगर पोलीस ठाणे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक’ मंजुर करण्यात आले आहे.
