गोरेगाव : गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई च्या कार्यक्षेत्रात मोतीलाल नगर नं.२, गोरेगाव (पश्चिम) मुंबई येथे एक इसम बेकायदेशिरपणे ‘एच.पी.’ आणि ‘कॅनन’ या नामांकित कंपनीचे हुबेहूब व बनावट टोनर तयार करीत आहे अशी माहिती कक्ष-१०, गुप्रशा, गुअवि, मरोळ, मुंबई येथील स.पो.नि. धनराज चौधरी यांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि. चौधरी यांनी माहिती कक्ष-१०, गुअवि., मरोळ, अंधेरी पूर्व मुंबई येथील प्र.पो.नि. महेशकुमार ठाकूर यांना अवगत करून पथक नियुक्त करून सदर ठिकाणी छापा कारवाईची योजना आखून’इन्फोर्सेस ऑफ इंटलेक्च्सुअल प्रॉपर्टी राईटस् (EIPR)’ या कंपनीच्या प्राधिकार प्राप्त अधिकारी यांना पाचारण करून गुप्तपणे निगरानी ठेवून मोतीलाल नगर नं.२, गोरेगाव (पश्चिम) मुंबई येथे दोन पंचांसह छापा टाकला असता तेथे ‘एच.पी.’ आणि ‘कॅनन’ या नामांकित कंपनीचे बनावट टोनर तयार करीत असल्याचे आढळून आले. तसेच त्याचबरोबर एच.पी. आणि कॅनन कंपनीचे बनावट टोनर, आऊटर बॉक्स, प्लॅस्टिक बॅग, स्टिकर तसेच एक संगणक आणि थर्मल प्रिन्टर अशी एकूण रू. २ करोड,७१ लाख, ५० हजार, ८१९ इतक्या रकमेचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला.सदर इसमास जप्त मुद्देमालासह गोरेगाव पोलीस ठाणे यांच्या देण्यात आले आणि आरोपीचे विरोधात गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाणे येथे चालू आहे.
आरोपी ची अधिक चौकशी केली असता त्याच्या विरोधात यापूर्वी माहिम पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे. आरोपीकडे केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी हा नामांकित कंपन्या, जसे एच.पी., कॅनन यांचे बनावट टोनर हे ऍमेझॉन सारख्यया कंपनीवर नोंदणी करून पदेशात जापान, बेल्जीयम, जर्मनी, स्पेन, इंग्लंड येथील मागणी नोंदविणाऱ्या कंपन्यांना मोठया प्रमाणावर पुरवठा करीत असल्याचे दिसून आले आहे. सदरचा अवैध व्यवसाय गेल्या वर्षभरापासून आरोपी करीत असल्याचे देखील दिसून आलेले आहे. सदरच्या कारवाईमुळे आरोपी करीत असलेल्या बनावट टोनर विक्री सारख्या अवैध व्यवसाय उध्दवस्त करण्यात पोलीसांना यश मिळालेले आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. दत्ता नलावडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, डि-पश्चिम, श्री. नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-१० गुप्रशा, गुअवि., मुंबई येथील प्रभारी पो.नि. महेशकुमार ठाकूर यांचे पर्यवेक्षणात सपोनि. विजय सांडभोर, सपोनि. धनराज चौधरी, तसेच अंमलदार मधुसुदन चवरे, अविनाश चिकणे, रामकिसन मोरे, संतोष जावळी आणि विकास अडसरे या पथकाने पार पाडली.
