आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोना स्थितीबद्दल पंतप्रधानांसोबत चर्चा केली. व राज्यातील मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबईः राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही.करोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोना स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. करोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर करोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात कोव्हिड रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. करोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची बेजबाबदार वागणूक आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत राज्यात करोनाचा सामना सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट
दहा राज्यांमध्ये ॲक्टीव्ह केसेसचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यामुळे करोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून करोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनामुळे आणि अनुभवातून करोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहे. एखाद्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२ तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन मोदींनी केलं आहे.
