दिनांक २ जुलै २०२१ रोजी मिराभाईंदर महानगरपालिकेच्या करविभागाचा आढावा मा.आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (मालमत्ता करविभाग) संजय शिंदे, सहा.आयुक्त श्री. गोडसे, सर्व प्रभाग अधिकारी सर्व कर निरीक्षक उपस्थित होते. करवसुली लवकरात लवकर कशी होईल व नागरिकांना कर भरताना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील या अनुषंगाने ही आढावा बैठक घेण्यात आली.
३१ मार्च पर्यंत वाट न पाहता आतापासूनच बिलाचे वाटप करून करवसूल करण्यासाठी त्याचा सतत पाठपुरावा करण्याचे निर्देश आयुक्त श्री.दिलीप ढोले यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले जेणे करून महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुरळीत राहील व विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. शहरातील नागरिकांना काही ठिकाणी वेळेत कराचे बिल उपलब्ध होण्यात अडचण निर्माण होते त्याकरिता शहरातील सर्व करभरणा करणाऱ्यांना कराचे बिल हे ईमेल व त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर वर मेसेज व व्हॉट्स ॲप द्वारे पुरविण्याची उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले.
तसेच आता पर्यंत ज्या करधारकांनी कर भरणा केला नाही आहे अश्या थकबाकीदाऱ्याना नोटीस बजावन्याचे निर्देश देण्यात आले.त्याचबरोबर वेळेत करभरणा करणाऱ्यांना ऑनलाईन सुविधेत कोणत्या प्रकारची सवलत देता येईल त्याविषयक उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश आयुक्त श्री.दिलीप ढोले यांनी दिले.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहरातील नागरिकां कडून व थकबाकी दाराकडून करवसुल करत असताना प्रथम मिराभाईंदर महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेत व लवकरात लवकर कर भरणा करण्याचे निर्देश आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी दिले.
शहरातील विकास कामे, नागरिकांना महानगरपालिका तर्फे उपलब्ध होणाऱ्या सुविधा या मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये त्याकरिता सर्व नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन वेळेत कर भरणा करण्याचे आवाहन आयुक्त श्री. दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.
