ठाणे उपप्रादेशिक परिवहन नंदकिशोर नाईक यांनी अधिकारी होण्यासाठी बोगस शैक्षणिक अर्हतेच्या आधार मिळवून पदोन्नती घेतली आहे अशी तक्रार महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली गेली होती त्यामुळे राज्यपालानी महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह विभाग) यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे .या बाबत मिळालेली माहिती असी की शरद काशिनाथ धुमाळ, अध्यक्ष राष्ट्रीय मानव हक्क मंच यांनी महाराष्ट्र राज्यचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या बोगस शैक्षणिक अर्हतेवर मिळविलेल्या पदोन्नती बाबत निवेदन केले होते. त्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन राज्यपालांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. नंदकिशोर नाईक हे लिपिक म्हणून परिवहन आयुक्त कार्यालयात शासकीय सेवेत दिनांक १० जून १९८२ रोजी रुजू झाले. ते बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण होते दिनांक २८/०९/१९८३ ते १५ /०४/ १९८४ या कालावधीत त्यांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी ही अत्यावश्यक असतानादेखील विज्ञान शाखेतील बारावी या अर्हतेवर त्यांना पदोन्नती देण्यात आली. नंदकिशोर नाईक हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावरून त्यांना मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत.नंदकिशोर नाईक यांनी सीमा तपासणी नाका येथे ओवरलोड वाहनावर मोटार वाहन कायदा १९८८ व त्यातील नियमानुसार कार्यवाही केलेली नाही प्रवासी वाहनांची कर वसुली केलेली नाही तात्पुरता परवाना नोंदवही ठेवलेली नाही वाहन चालक यांच्याकडून प्राप्त तक्रारींची नोंद ठेवलेली नाही तीन बिंदू तपासणी प्रमाणीकरण केले नाही महालेखाकार यांच्या लेखात आक्षेपांचे निराकरण केले नाही.अंतर्राष्ट्रीय वाहनचालक परवाण्याची वैधता तपासली नाही. पर्यावरण कर वसुली केली नाही. दर सोमवारी जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मुख्यालयात हजर नव्हते. सदरची माहिती शरद धुमाळ यांनी माहिती अधिकार कायद्याखाली घेतली होती, या माहितीचे गांभीर्य लक्षात घेता यासंदर्भात शरद धुमाळ यांनी राज्याचे परिवहन आयुक्त व प्रधान सचिव यांच्याकडे निवेदन सादर केले होते परंतु संबंधितांनी तक्रारीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता त्यामुळे शरद धुमाळ यांनी अखेरीस महाराष्ट्र राज्यपालाकडे निवेदन दिले या निवेदनाची गंभीर दखल घेऊन राज्यपाल कार्यालयातील अध्यक्ष प्रशासन जयराज गो. चौधरी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांना नंदकिशोर नाईक यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिवहन आयुक्त पदावर नव्याने रुजू झालेल्या अविनाश ढाकणे हे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
