दि. २८/०७/२०२१ बँकेत होणारे आर्थिक घोटाळे तसेच बँका दिवाळखोरीत निघण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. याचा परिणाम सामान्य खातेदारांना भोगावा लागतो . यातच आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिपॉजिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडिट गॅरेंटी कार्पोरेशन अक्ट (डि आय सी जी सी )दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या नुसार बँक बुडाल्यानंरतही ठेवीदारांची ५ लाख रुपया पर्यंतची रक्कम सुरक्षित राहणार असून , ९० दिवसांच्या आत हे पैसे परत केले जाणार आहेत.
पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी ) बुडाली तसे लक्ष्मी विलास, येस बँकाही दिवाळखोरीत निघाल्या याचा फटका लाखो ग्राहकांना बसला व अद्यापही खातेदारांना त्यांचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत. केंद्र सरकारने पीएमसी बँक बुडाल्यानंतर ठेवी विम्याची मर्यादा पाच पट वाढविण्याची घोषणा केली होती. पण कोरोना महामारीमुळे वर्षभर याची अमंलबजावणी झाली नाही . दि,२८/०७/२०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ‘ डि आय सी जी सी ‘ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
सध्या बँक बुडाल्यास ग्राहकांची एक लाख रुपया पर्यंतची रक्कम सुरक्षित राहत होती. आता हि सुरक्षित रक्कम पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे. तसेच जर ग्राहकाची एकाच बँकेच्या विविध ब्रँचमध्ये एकापेक्षा जास्त खाती असली तरी त्या सर्व खात्यांमधील एकत्रित पाच लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित असेल आणि ९० दिवसांत हि रक्कम ग्राहकाला परत मिळणार आहे या बातमीमुळे बँक ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
