विरार : दिनांक २७/११/२०२१ रोजी म्हारंबळपाडा, विरार पश्चिम,येथील जेट्टीपासुन आत १०० मिटर अंतरावर समुद्राच्या पाण्यात अनोळखी मयत महिला वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असलेले प्रेत अर्धवट कुजलेले स्थितीत अर्नाळा पोलिसांना मिळुन आले होते. सदर मयत महिलेचा गळा आवळुन कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तीला ठार मारुन पुरावा नष्ट करण्याकरीता मयत महिलेच्या गळयात नॉयलॉन दोरी बांधुन त्या दोरीस अंदाजे १० किलो वजनाचे दगड बांधुन तीस म्हारंबळपाडा जेट्टी नं.२२, पाण्यामध्ये टाकुन दिले होते. या बाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने मा. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास सुरु केला. तपसादरम्यान विरार पोलीस ठाणे येथे दाखल मनुष्य मिसींग मधील महिला हिचे वर्णन गुन्हयातील मयत महिलेशी मिळते जुळते असल्याचे निष्पन्न झाल्याने गोपनिय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळवुन व तांत्रीक विश्लेषणाव्दारे मृतक महिला हिचा प्रियकर हर्षद जावु पाटील वय २६ वर्षे,यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता मृतक हिच्याशी वारंवार होत असलेल्या वादातुन त्याने सदर गुन्हा त्याचा मित्र क्रितेश अशोक किणी वय – २८ वर्षे याच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असून पुढिल तपास अर्नाळा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्रीमती पद्मजा बडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि/ प्रमोद बडाख, पो.नि/ शाहुराज रणवरे, सपोनि/ ज्ञानेश्वर जगताप, पोउपनिरी/ शिवाजी खाडे, पो.ना/ मनोज चव्हाण, प्रदीप टक्के, सागर बारवकर, मनोज सकपाळ, सचिन घेरे, मुकेश तटकरे, पो.शि/ अश्विन पाटील, सर्व नेम- गुन्हे शाखा, यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
