भाईंदर : पोलीस असल्याची बतावणी करुन जुलमाने पैसे उकळणा-या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार विनोद मौर्या, वय २७ वर्षे,यांचे किराणा दुकान असुन दिनांक ०३/०५/२०२२ रोजी मिळालेल्या ऑर्डरची पुर्तता करण्यासाठी ते स्कुटी मोटार सायकलवर गेले असता इंद्रलोक नाका येथील पानटपरीवर मालाची डिलेव्हरी करीत असतांना तेथे दोन अनोळखी इसमांनी येऊन ते पोलीस असल्याचे सांगितले व “तुम्ही गुटखा विक्री करता” असे बोलुन त्यांनी विनोद मोर्या यांना एका रिक्षात बसवुन गोल्डन नेस्ट सर्कल येथे नेवून त्यांच्याकडे डिलेव्हरी केलेल्या मालाचे मिळालेली रोख रक्कम १८,०००/- रु. हे जबरदस्ती करून घेऊन गेले त्याबाबत मोर्या यांनी दिलेल्या तक्रारी वरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन नवघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. तपास पथकाने घटनास्थळ व गोल्डन नेस्ट सर्कल तसेच इतर ठिकाणावरुन माहिती प्राप्त केली असता अनोळखी आरोपींनी स्कुटी मोटार सायकलचा वापर केला असल्याचे समजुन आले. सदरचा गुन्हा करणारा एक आरोपी सिध्दार्थ रामदास जोहरे, वय ३९ वर्षे, असल्याचे निष्पन्न झाले होते परंतु पोलीसांची चाहुल लागल्याने तो त्याच्या घरातुन निघुन पळुन गेला होता. त्यानंतर आरोपींचा तांत्रीक माहितीचे आधारे तपास करीत असतांना आरोपी सिध्दार्थ जोहरे हा बदलापुर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेत असतांना त्याचा साथीदार अब्दुल अहमद खान, वय ५९ वर्षे हा त्या ठिकाणी मिळून आल्याने त्या दोघांना दिनांक ११/५/२०२२ रोजी नवघर पोलिसांनी या गुन्हयात अटक केली. आरोपी यांनी गुन्हा करतांना वापरलेली स्कुटी मोटार सायकल व पोलीस असल्याची बतावणी करुन लुबाडलेल्या रक्कमेपैकी ८,०००/- रु. रक्कम हस्तगत करुन गुन्हा नवघर पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहायक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/अभिजीत लांडे, पोहवा/भुषण पाटील, पोना/गणेश जावळे, पोशि/संदिप जाधव, सुरज घुनावत, ओंमकार यादव विनोद जाधव यांनी केलेली आहे.
