दिनांक ०८/०८/२०२१ रोजी रात्रौ ११:३० वा. च्या सुमारास विरार पोलीस ठाण्यामध्ये एक दक्ष महिला अकरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना स्वत: सोबत घेऊन आल्या व सांगितले कि, विरार रेल्वे स्थानकामध्ये सदरच्या दोन्ही मुली त्यांना फिरताना दिसल्याने त्या त्यांना घेवुन येथे आलेल्या आहेत. सदरचा प्रकार हा विरार पोलीस ठाण्यात “मुस्कान पथक” अंतर्गत कर्तव्य करणारे परि.पो.उप.निरि संविधान रमेश चौरे व विकास सुकलवाड यांनी अत्यंत संवेदनशिलपणे हाताळला.
सदर विषयाचे गांर्भिय पाहता संविधान रमेश चौरे आणि विकास सुकलवाड यांनी दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे आरती यादव आणि उजमा मोहम्मद रफिक चौधरी असे सांगुन आमचे आई-वडील रागवल्याने घरातुन निघुन रेल्वेने विरार येथे आल्याचे सांगितले. मात्र त्यांना स्वत:चा पत्ता म्हाडा कॉलनी, कांदिवली (प.) इतकाच सांगता येत होता. त्यामुळे उपरोक्त अधिकारी यांनी कांदिवली (प.) अंतर्गत येणारे “कांदिवली आणि चारकोप पोलीस ठाणे” येथे संपर्क साधून सदर मुलींच्या अनुषंगाने अपहरणाचा गुन्हा किंवा तक्रार आहे किंवा कसे याबाबत माहिती घेतली. मात्र दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकाराचा कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे त्यांनी सदर दोन्ही मुलींचे फोटो मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाअंतर्गत असलेले सर्व पोलीस ठाणे तसेच “कांदिवली आणि चारकोप पोलीस ठाणे” येथील वॉट्सअप गृपवर पाठवून नोंद घेण्यास सांगितले. तसेच काही माहिती मिळाल्यास तात्काळ विरार पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधण्यास सांगितले.
त्याप्रमाणे दिनांक ०८/०८/२०२१ रोजी रात्री उशीराने दोन्ही अल्पवयीन मुलींचे पालक कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार नोंदविण्यास आले असता, कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी त्यांना विरार पोलीस ठाण्यामध्ये संपर्क करण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही अल्पवयीन मुलींचे पालक सुनिता अमरनाथ यादव, रा. एकता नगर, होली इन फॅन्ड स्कुलजवळ, चारकोप, कांदीवली प. व सलीम रफिक चौधरी रा. सदर हे विरार पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर खात्री करुन अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहे. सदरची कामगिरी विरार पोलीस ठाण्यातील “मुस्कान पथक” अंतर्गत कर्तव्य करणारे संविधान रमेश चौरे आणि विकास सुकलवाड परि.पोलीस उप निरिक्षक यांनी केली आहे.
