वडाळा : दिनांक २०/११/२०२१ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-०४, अँटॉपहील मुंबई पोलीस ठाणे, वडाळा यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि २१/११/२०२१ रोजी चेंबूर शिवडी रोड, वडाळा, याठिकाणी एक ३५ ते ४०वर्षे वयोगटातील नायजेरीयन नागरीक मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्यावरून पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येवून सदर परिसरात सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इसम प्रसंशयितरित्या उभा असल्याचा व कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांना दिसुन आले.त्यावेळी त्याच्या हातामध्ये एक निळया रंगाची मोठी प्लॅस्टीक पिशवी होती. त्याच्या हालचाली संशयीत वाटल्याने हि व्यक्ती तीच असल्याची खात्री झाल्याने नमुद पोलीस पथकाने घेराव घालुन त्यास पळुन जाण्याची संधी न देता झडप टाकुन ताब्यात घेतले त्यानंतर जागीच कायदेशीर बाबींची पुर्तता करून त्याची झडती घेतली असता प्लॅस्टीक बॅगेमध्ये एकूण पाच वेगवेगळया रंगाच्या लेडीज मोठया नवीन पर्स मिळून आल्या. सदर सर्व पर्सची पाहाणी केली असता पर्सच्या आतील दोन्ही बाजूस असलेल्या कापडी अस्तरच्या आत मध्ये संशयीत वस्तू असल्याचे आढळून आले. म्हणून सदर पर्सचे अस्तर फाडून पाहाणी केली असता त्यामध्ये एकूण ४ किलो ९६५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.)अंदाजे किंमत ४ करोड,९६ लाख, ५० हजार व १९८ ग्रॅम कोकेन अंदाजीत किंमत३९ लाख,६० हजार असे एकूण ५ करोड, ३६ लाख, १० हजार रूपये एवढया किंमतीचे अंमली पदार्थ मिळून आले. सदरचे अंमली पदार्थ हे आरोपी याने दिल्ली वरून आणल्याचे सांगितले आहे. सदरबाबत वडाळा पोलिस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा नोद करून आरोपीस नमूद गुन्हात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री एस विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), श्री.नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पो.नि. भांबळ, सपोनि बिराजदार, सपोनि गव्हाणे मसपोनि पवार, पोउनि आंब्रे, पोहक्र/परब, पोहक्र/सुर्यवंशी, पोहक्र /निखाडे, पोनाक्र /कांबळे, पोनाक्र /पाटिल, पोशिक्र/घेरडे पोशिक्र. अनुपम जगताप, पोशिक/चौरे,पोशिक्र /रोटे यांनी पार पाडलेली आहे.
