मिरारोड : मोटार सायकल चोरी तसेच चोरी करणाऱ्या ०३ आरोपीना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीतुन अज्ञात आरोपींनी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची व ०१ जबरी चोरीची घटना दिनांक २१ ते २२/७/२०२२ रोजीच्या दरम्यान घडली होती अशाप्रकारे एकाच दिवशी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची घटना घडल्याने मोटार सायकल चोर सक्रिय झाल्याचे दिसुन आले. सदर घटनेची नयानगर पोलीसांनी गंभीरतेने दखल घेवुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ व सहा पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि प्रणय काटे व सपोनि पराग भाट यांचे अधिपत्याखाली अज्ञात चोरटयांचा माग काढण्याकरीता दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
अश्याप्रकारचे गुन्हे घडलेल्या परिसरातून तांत्रीक पुरावे हस्तगत करुन व गुप्त बातमीदारांचे मार्फतीने अज्ञात आरोपींचा शोध पोलीस सर्व माध्यमातुन घेत होते त्याचदरम्यान दिनांक २३.०७.२०२२ रोजी नयानगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक एम एच – ०२- डी एक्स – १२९९ ही होंडा कंपनीची ऍक्टिवा मोटार सायकल भोलानगर झोपडपट्टी, सुभाष नगर, भाईंदर (प) येथे दिसून आली. सदर ठिकाणी नमुद पथकाने सापळा रचला असता थोडयावेळाने सदरची मोटार सायकल घेण्याकरीता ०३ इसम आले. पोलीसांची चाहुल लागताच सदरचे इसम पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने त्या सर्वांना चोरीच्या मोटार सायकलीसह शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या ०३ आरोपींपैकी ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक असुन त्याच्याकडून पोलिसांनी कसुन तपास केला असता त्यांनी नयानगर पोलीस ठाणे हद्दीतून ०४ मोटार सायकल चोरी, ०१ चोरी तसेच नवघर पोलीस ठाणे हद्दीतील ०१ मोबाईल चोरीची कबुली दिल्याने त्यांचेकडुन एकुण ०६ गुन्हयांची उकल होवुन सदर गुन्हयांतील एकुण ४ मोटार सायकल व इतर गेला माल हस्तगत करण्यात नयानगर पोलीस ठाण्यास यश आलेले आहे.
वरील कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१ मिरारोड, डॉ. श्री. शशिकांत भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नयानगर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि प्रणय काटे, सपोनि पराग भाट, पोहवा/हापसे, पोहवा/गुरव, पोहवा/बागवान, पोहवा/विकास यादव, पोना/वारके, पोना/कांबळे व पोअं/खामगळ यांनी पार पाडली आहे.
