नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, ६ लाख ४२ हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखु पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. अधिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी गुन्हे परिषदेच्या वेळेस जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु याबाबत माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना दिनांक ६/६/२०२२ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील पटेलवाडी भागात एका इसमाने सुगंधीत तंबाखुचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून तो त्याची विक्री करणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
सदरबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथे सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पटेलवाडी येथील मशिद ए उमरच्या समोरील एका घरावर छापा टाकला. सदर घरामध्ये असलेल्या अब्दुल हमीद शेख वय-४३ रा. पटेलवाडी यास पळून जाताना पोलसांनी शिताफिने ताब्यात घेतले. सदर इसमाच्या घराची पाहणी केली असता एका कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या आढळून आल्या . त्या गोण्या पोलिसांनी पंचासमक्ष उघडून पाहिले असता त्यामध्ये विविध कंपनीच्या सुगंधीत तंबाखुची ९३२७ पाकीटे किमंत रुपये ६,४२,३००/- असा एकूण मुद्देमाल मिळुन आला असल्यामुळे आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरची सुगंधीत तंबाखु कोठुन आणली? याबाबत विचारण केली असता तो काहीही सांगण्यास तयार झाला नसला तरी सदर गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी असून त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, पोलीस शिपाई अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, अभय राजपुत यांनी केली आहे.
