वसई : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने वसई येथे घरफोडी केलेल्या सराईत आरोपींना गजाआड करून १५ गुन्ह्यांची उकल केली. मिळालेल्या माहिती नुसार वसई येथील पेल्हार पोलीस ठाणे हददीतील हॉटेल साई दर्शन रेस्टॉरंस्ट, बार व लॉर्जिंग तसेच नवकार ट्रेडर्स, वसई फाटा, वसई (पु.) याठिकाणी दिनांक १९/०७/२०२२ रोजी श्री. मनीष चंद्रमा सिंग व साक्षीदार यांच्या पहाटेच्या सुमारास हॉटेल व दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटरचे लॉक तोडून त्यावाटे आत प्रवेश करुन कॅश काऊंटरमध्ये ठेवलेली एकुण ६६,०००/- रुपये रोख रक्कम चोरी करुन चोरुन नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींन विरुद्ध पेल्हार पोलीस ठाणे येथे दिनांक १९/०७/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हा घडला त्याठिकाणी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट दिली व मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहीतीच्या आधारे गुन्हयातील आरोपींची ओळख पटवून सराईत आरोपी १) इमरान अन्सारी ऊर्फ छोटे ऊर्फ इमो, रा. मालवणी, मुंबई २) शफीउल्ला अतिउल्ला ऊर्फ सोनु, रा. बिलालपाडा, नालासोपारा (पु.) यांना सापळा रचुन त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने दिनांक ०४/०९/२०२२ रोजी नमूद गुन्हयात अटक करण्यात आली. तपासादरम्यान सदर आरोपी यांनी १) वेगवेगळया कंपन्यांचे एकुण २० मोबाईल फोन, २) ५३.३३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३) ४२.६७० ग्रॅम चांदीचे दागिने, ४) एक मोटर सायकल, ५) १६,२००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ४,०४,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन एकूण १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
त्याचप्रमाणे आरोपी १) इमरान अन्सारी ऊर्फ छोटे ऊर्फ इमो यांचेवर मालवणी, वालीव, नवघर, काशिमिरा, नालासोपारा या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ११ गुन्हे दाखल असुन आरोपी २) शफीउल्ला अतिउल्ला ऊर्फ सोनु याचेवर नालासोपारा, वालीव, कुर्ला या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ४ गुन्हे दाखल आहेत असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाधुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उप.नि. सनिल पाटील, पो.हवा. योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, पो.ना. प्रताप पाचुंदे, पो.अं. संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांनी पार पाडलेली आहे.
