आरोग्य प्रतिनिधी – कोरोना महामारीमुळे भारतामध्ये सर्वच स्तरावर नुकसान झाले असले तरीही न्यूमोनिया या आजाराविषयी चांगल्या प्रकारे जनजागृती झाली असून अनेक नागरिक न्यूमोनिया या आजाराला आता गांभीर्याने घेत आहेत. न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार असून २०१९ मध्ये जगभरात २५ लाख नागरिक मृत्युमुखी पडले असून यात ६ लाख ७२ हजार लहान मुलांचा समावेश आहे.
कोरोना महामारीमुळे ‘न्यूमोनिया’ हा शब्दच भीतीदायक झाला असून याविषयी अधिक जनजागृती करणे महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक सुरक्षित उपाय असून त्याशिवाय नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातेने स्तनपान देणे, लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान टाळणे, तसेच मुलांना पोषक आहारासह प्रदूषण नसलेल्या मोकळ्या हवेत नेणे , याद्वारेही बालकांना होणारा न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मत जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. १२ नोव्हेंबर हा दिवस न्यूमोनियाविषयी जागरुकता करण्यासाठी जागतीक न्यूमोनिया दिन म्हणून पाळला जातो.
याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथील अॅपेक्स हॉस्पिटलचे सल्लागार एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात,” ३ महिने ते ५ वर्षांपर्यंतची लहान मुले व ६५ वर्षांच्या वरच्या व्यक्तींनाही न्यूमोनिया होऊ शकतो.पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनियापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा सर्वांत चांगला उपाय आहे. न्यूमोनियाच्या आजारात फुफुसामध्ये संक्रमण अथवा फुफ्फुसांमध्ये कफ भरला जातो न्यूमोनियामुळे फुफ्फुसांमध्ये शुद्ध हवेचा प्रवाह येण्यात अडथळा येतो व त्यामुळे शरीरामधील ऑक्सिजनची पातळी कमी होते. न्यूमोनियाच्या प्रादुभावामुळे श्वास घेताना त्रास होणे, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे, खोकला, ताप, थरथरणे किंवा थंडी वाजणे, घाम येणे अशी लक्षणे आढळतात.
सध्या आपण सर्वजणच कोरोना महामारीशी सामना करीत असून कोरोना व न्यूमोनियाची लक्षणे सारखीच असतात त्यामुळे अनेकांची गफलत सुद्धा होऊ शकते त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या वैद्यकीय चाचण्या करून निदान करून घेणे गरजेचे आहे. ज्या पेशंटना जन्मापासूनच अस्थमा अथवा दम्याचे विकार असतील त्यांनी या काळात काळजी घेणे महत्वाचे आहे कारण आता थंडीचा मोसम सुरु झाल्यामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो परंतु कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता यावेळी गाफील राहून चालणार नाही. वृद्ध लोक, मधुमेह, हृदयरोगी किंवा इतर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना न्यूमोनिया होण्याची जास्त भीती असते म्हणून, अशा लोकांना विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मधुमेह आणि हृदय असलेल्या रूग्णांची तपासणी करून घ्यावी; जर आपल्याला खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर त्वरित तज्ञांना भेटले पाहिजे.”
गेल्या काही वर्षांत इंटरनेटच्या मध्यमातून न्यूमोनिया लसीकरणाबद्दल जनजागृती वाढल्यामुळे न्यूमोनियाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे;तरीही जागतिक आरोग्य परिषदेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार जागतिक स्तरावर दर वीस सेकंदांना एक बालक या संसर्गाने मृत्युमुखी पडतं आहे. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे नेहमी म्हणतो. न्यूमोनियाच्या बाबतीत सुद्धा बालकांची जेवढी काळजी घ्यावी लागते, तितकीच वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचीही काळजी घेणं आवश्यक ठरतं. ज्या वयस्कर मंडळींना श्वसनमार्गाचा किंवा फुफ्फुसांचा जुनाट आजार असतो किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर काही आजार असतात त्यांना श्वसनमार्गाचा संसर्ग झाल्यावर पुढे न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिकेचे कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षकांनी कोरोना संक्रमण काळात सर्वेक्षण करून अप्रत्यक्षरीत्या न्यूमोनिया या आजाराविषयी जनजागृती केली आहे अशी माहिती एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली.
