मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा वाहतूक विभागाचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांचे कार्यक्षेत्रातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली वाहने, अनेक दिवस रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेली वाहने, पादचा-यांना चालण्यास व वाहतूकीस अडथळा करित असलेली वाहने तसेच महानगरपालीका सफाई विभागास साफसफाई करतांना ज्या वाहनांचा अडथळा होऊ लागला तसेच वाहनांखाली अवती-भवती कचरा साठून अस्वच्छता व रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहेत अशी बेवारस वाहने काशिमिरा वाहतूक विभागाकडून ताब्यात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या कनकिया, लक्ष्मीपार्क, मिरारोड पुर्व येथील बंदिस्त सर्व्हे क्र. २५१ या जागेत ठेवण्यात आलेली आहेत. सदरची प्रक्रिया ही सुमारे गेल्या १० वर्षांपासून सतत चालू असून आतापर्यंत मोठया संख्येने विविध प्रकारची वाहने ठेवण्यात आलेली आहेत आणि यामुळे सदरचा परिसर व्यापला असून जागा अपुरी पडत आहे.सदर ताब्यात असलेल्या बेवारस वाहनांपैकी ११२ मोटार सायकल हया पुर्ण गंजून गेल्या असून त्यांचे इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक तसेच त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक मिळून येत नाही. याबाबत नागरिकांना अवगत होण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांत, प्रसिध्दी माध्यमांमध्ये प्रसिध्दी देण्यात येत असून वाहनांबाबत हक्कदार यांनी त्यांचे मुळ कागदपत्रांसह वरीष्ठ पोलीस निरिक्षक, काशिमिरा वाहतूक विभाग, परि-१, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचेशी संपर्क साधण्यात यावा याबाबत आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाचे अनुषंगाने १५ दिवसांत नमूद विनादावा असलेल्या ११२ वाहनांबाबत दावा अगर मालकीहक्क सिध्द न झाल्यास त्यांच्या निर्गतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
