वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेवजी गाव ते बैजलपाडा या रस्त्यावरती दुपारच्या सुमारास एका युवकाला जळण्याच्या जखमासहीत लोकांनी पाहिले. त्या लोकांनी घोलवड पोलीस ठाण्याला कळविले. त्यानुसार घोलवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचले आणि त्या युवकाला उपचाराकरिता कॉटेज हॉस्पिटल डहाणू येथे दाखल करण्यात आले. अधिक उपचाराकरिता आय.एन.एस अश्विनी हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुरजकुमार मिथिलेश दुबे वय-२७ वर्ष असून ते राहायला राज्य झारखंड येथील रहिवासी होते. सुरज कुमारी इंडियन नेव्ही मध्ये लीडिंग सी मॅन या पदावर काम करत होते. त्यांची आय.एन.एस. अग्रीनी कोईमतूर तामिळनाडू येथे पोस्टिंग झाली होती.
सुरजकुमार दुबे यांच्या जबाबावरून दिनांक- १/१/२०२१ ते १/२/२०२१ पर्यंत ती रजेवर होते. दिनांक- ३०/१/२०२१ रोजी सुट्टी संपवून ते रांची येथून सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान विमानाने बसून चेन्नई विमानतळावर पोहच%A े. विमानतळाच्या बाहेर आल्यावर ३ अज्ञात इसमांनी सुरज कुमार यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला व त्यांच्याकडील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने चोरून घेतला. सुरजकुमार यांना सफेद रंगाच्या एस.यू.व्ही गाडी मधून कोंबून त्यांचे अपहरण केले आणि त्यांना ३ दिवस चेन्नई येथे कोंडून ठेवले.
दिनांक. ४/२/२०२१ रोजी सायंकाळी चेन्नई येथे गाडीत बसविण्यात आले. त्यानंतर पुढील घटनाक्रम त्यांना समजत नाही. दिनांक-५/२/२०२१ रोजी सकाळी घोलवड जवळील वेवजी गावाच्या बैजलपाडा जंगलात नेले व त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद दिल्याने घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०६/२०२१ कलम ३०७, ३६४(अ), ३९२,३४२,३४ भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान जखमी सुरजकुमार यांचा मृत्यू झाल्याने भा.द.वि.स.कलम ३०२ हे कलम सदर गुन्ह्यातील वाढविण्यात आलेली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास श्री. धनाजी नलावडे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू, विभाग डहाणू यांच्याकडे देण्यात आले आहे.
सदर तपास दरम्यान पुढील बाबी निदर्शनास आल्या आहेत.
१) दिनांक-३१/१/२०२१ रोजी सुरज कुमार यांच्या वडिलांनी सुरज कुमार यांचा फोन बंद लागल्याने त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे चहलपूर जिल्हा झारखंड येथे हरविलेबाबत तक्रार दिलेली आहे. तसेच त्यांनी आय एन एस अग्रीनी कोईमतुर येथील कमांडट ऑफिसर श्री.अशोक रॉय यांना सुद्धा माहिती दिली आहे. त्यावरून इंडियन नेव्हीच्या नव्हल पोलीसांनी देखील तपास सुरू केला आहे.
२) नेव्ही व झारखंड पोलीसांकडून तपास सुरू असताना असे लक्षात आले की, सुरजकुमार यांच्या कुटुंबाला सुरज कुमार कडे दोन मोबाईल नंबर असल्याचे माहित होते. तपासादरम्यान सुरज कुमार यांच्याकडे आणखीन तिसरा मोबाईल नंबर असून त्यावर दिनांक- १/२/२०२१ सुरज कुमार यांचा चुलत भाऊ श्री.चंदन कुमार यांनी फोन केला होता व तो दिनांक. १/२/२०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत चालू असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर तो फोन देखील बंद करण्यात आलेला आहे. तसेच त्या मोबाईलवरून सुरज कुमार यांनी अस्था कंपनी भोपाळ व मुंबई आणि एंजल कंपनी मुंबई शेअर मार्केट कंपनी मध्ये सतत दोन दिवस मोठ्या प्रमाणात व्यवहार केलेला आहे.
३)सुरज कुमार यांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता त्यांचे पगार खाते हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुलाबा मुंबई येथील असून त्या खात्यामध्ये आतापर्यंत ८,४३,००/- रुपयाचे वैयक्तिक कर्ज घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. या खात्यामधून सातत्याने शेअर ट्रेडिंग झालेले असून शेवटी फक्त ३०२ रुपये शिल्लक आहेत. या पगार खात्या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया आय.एन.एस. नेव्ही मुंबई येथे दुसरे बँक खाते असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमध्ये पाच हजारापेक्षा जास्त रक्कम होती. सदर खात्यातून दिनांक- १/२/२०२१ रोजी चेन्नई येथील एका ए.टी.एम मधून पाच हजार रुपये काढले ते निष्पन्न झाली आहे. व या खात्यामध्ये अखेर फक्त ९० रुपये शिल्लक आहे.
दोन्ही खात्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याचे दिसून येत आहे.
४)सुरज कुमार यांनी आय. एन. एस. नेव्ही तेथील त्यांचे सहकारी यांच्या कडून सहा लाखापर्यंत हॅन्ड लोन घेतले आहे. त्याचे सहकारी घेतलेल्या हॅन्ड लोनची सुरजकुमार कडे मागणी करीत होते. परंतु अद्याप पावेतो त्यांनी दिलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
५) दिनांक. १५/१/२०२१ रोजी सुरज कुमार यांचा साखरपुडा झाला असून सासरकडील लोकांनी एकूण नऊ लाख रुपये बँक खात्यामध्ये व इतर स्वरूपात दिलेले आहे.
सदर तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशान्वये श्री. प्रकाश गायकवाड अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० पथके तयार केलेली आहे.
प्रत्येक पथकामध्ये एक अधिकारी व दहा अंमलदार यांचा समावेश केलेला आहे. सदरची पथके महाराष्ट्रात व भारतातील इतर राज्यात तपासकामी परवाना करून सखोल तपास करीत आहेत.
