अंधेरी : दिनांक १३/०६/२०१४ रोजी रूम नं. ०३, गणपत चाळ,अंधेरी पुर्व, ह्या घराचा दरवाजा बाहेरून कुलूप लावुन बंद सुन रूम च्या आत मधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दत्ताराम मारोती वाघमारे. यांनी पवई पोलीस ठाणे येथे केली होती पोलिसांनी घटनास्थळी जावून बघितले असता त्याठिकाणी वृध्द महिला शशीकला मारोती वाघमारे, वय ७५ वर्षे, हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरामध्ये मिळून आला. मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल व पवई पोलीस ठाणे यांनी केलेला तपासात सदर वृध्द महिलेच्या अंगावरील दागीने चोरी करून तिचा गळा दाबुन खुन केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने गुन्हा करताना कोणत्याही प्रकारचा पुरावा न सोडल्याने नमुद गुन्हा बऱ्याच वर्षांपासुन उघडकीस आला नव्हता. सदर गुन्हयाचा संमातर तपास कक्ष -१०, मार्फत करण्यात येत होता.
प्रभारी पोलीस निरीक्षक, महेशकुमार ठाकूर यांनी मागील ०६ महिन्यापासुन सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सपोनि धनराज चौधरी, सपोनि गणेश तोडकर, पो.ह./धारगळकर, पो.ह. /शेटे यांचे पथक स्थापन केले होते. सदर पथकाने सदर गुन्हयाचा नव्याने सुरवातीपासुन तपास सरू केला पथकाने मयताचे नातेवाईक, स्थानिक लोकांकडे वेळोवेळी चौकशी करून गुन्हयाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा केली. पंरतु आरोपी अगर गुन्हयाचा नेमका हेतु याबाबत माहिती प्राप्त होत नव्हती. मयताच्या नातेवाईकांकडे सतत कौशल्यपुर्ण तपास केल्याने मयताचा नातु प्रदिप तुकाराम सोनावणे, हा कोणत्याही नातेवाईक अगर मित्र मंडळी यांच्या संपर्कात नव्हता. तसेच तो पत्नी व घर सोडून खुन झाल्याचा तारखेपासून फरार झाला असल्याचे पोलिसांना माहिती प्राप्त झाली. त्याचे सोशल मिडीया अकाउंटस तपासले असता तो सोशल मिडीयावर देखील सक्रीय नसल्याचे दिसून आले. सदर कारणांमुळे मयत महिलेचा नातु प्रदिप तुकाराम सोनावणे याच्यावर पोलिसांचा अधिकाधिक संशय बळावला.त्यावरून पोलीस आरोपीच्या मागावर होते परंतु त्याचा काही सुगावा लागत नव्हता पण काही दिवसांपवी नमुद संशयीत आरोपीताने त्याचे नातेवाईकाला सोशल मिडीया व्दारे संपर्क केल्याची माहिती पथकास प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे आरोपीचे सोशल मिडीया अकाउट तपासले असता त्याने अकाउंट डिलीट केल्याचे समजले. परंतू आरोपीचे फोटो प्राप्त करण्यास पथकास यश प्राप्त झाले. वरीलप्रमाणे तुटपुंज्या माहितीच्या आधारे पथकाने केलेल्या तांत्रिक तपासामध्ये आरोपी कल्याण परिसरांत राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्याठिकाणी रात्रंदिवस कल्याण परिसरांत आरोपीचा शोध सुरू केला असता तो रंगकाम ( पेन्टर ) चे काम करीत असल्याचे समजले.पोलिसांनी वेशांतर करून आरोपी हा कल्याण येथील नांदीवली गावांत राहत असल्याची माहिती मिळवली पथकाने स्वत:ची ओळख लपवून सतत नांदीवली परिसरांत आरोपीबाबत गोपनीय चौकशी करून त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला. आरोपीचा मोबाईल क्रमांक मरोळ अंधेरी येथील पत्त्यांवर रजिस्टर असल्याने तसेच तो अनोळखी कॉल स्विकारत नसल्याने शोध घेणे पोलीस पथकास अवघड झाले होते. आरोपी हा मागील ७ वर्षापासून स्वत:चे आस्तित्व लपवून फरार असल्याने पथकाने कोणताही धोका न पत्करता नांदीवली परिसरांत एका घरामध्ये कलरचे काम करायचे असे चित्र निर्माण करून त्याच्या ओळखीच्या इसमामार्फत आरोपीस रंगाचे काम करण्यासाठी बोलावून घेवून शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीस कक्ष कार्यालयात आणून त्याची विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू पोलीस पथकाने आरोपीकडे सतत वेगवेगळया क्लुप्त्या वापरून चौकशी केली असता त्यानेच आजीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे अधिक तपास केला असता मयत आजीने आरोपीच्या दुसऱ्या प्रेमविवाहांस नकार दिला होता. तसेच आजी दुसऱ्या पत्नीस सतत आरोपीविरूध्द भडकवत असल्याने रागाच्या भरात आरोपीने हाताने तिचा गळा दाबून खुन करून पळून गेला असल्याचे सांगितले. सदर आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाहीसाठी पवई पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, श्री. नीलोत्पल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष -१० चे पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर, सपोनि. धनराज चौधरी, सपोनि गणेश तोडकर, पोह / थारगळकर, पोह /शेटे आणि पोना /रमेश नलावडे यांनी पार पाडली.
